Sindhudurg Crime News | धक्कादायक ! सासरच्यांनी जावयाला विजेचा शॉक देऊन मारलं; पत्नीसह सासू ,सासऱ्यावर गुन्हा दाखल

Sindhudurg Crime News

सिंधुदुर्ग : Sindhudurg Crime News | | आज समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी या केवळ स्त्रियाच नव्हे, तर कित्येक पुरुषही आहेत. बर्‍याच वेळा पुरुष आणि त्यांचे कुटुंबीय यांनाही खोट्या आरोपांखाली अडकवले जाते. आपल्या पित्तृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषावर अन्याय आणि अत्याचार होतो, हे कुणी मान्यच करताना दिसत नाही. त्यामुळे अनेकदा पुरुष याविषयी कुठेही तक्रार करत नाहीत.

कुणी यासंदर्भात तक्रार केलीच, तर त्याला ‘तू पुरुषासारखा पुरुष असतांना बायकांसारख्या तक्रारी काय करतोस ?’, असे म्हटले जाते. त्यातून मन:स्ताप, व्यसन आणि कटकटी यामुळे अनेक पुरुषही नैराश्यात जात आहेत. तर कौटुंबिक वाद-विवाद हे अनेकदा त्यांच्या जीवावर बेतत असतात. अशीच एक खळबळजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे.

सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (दि.१२) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय-३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. मंगळवारी (दि.१३) त्याचा मृतदेह सासरवाड येथील एका नर्सरीत आढळून आला. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली, असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केला.

यासंदर्भात त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली. वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत भगे याला त्याची पत्नी नुतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावून घेतले.

संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. वसंत हा पत्नीच्या बोलवण्यावरून सासुरवाडीला गेला असता, त्याचा स्पर्श या विद्युत तारांना झाला. यामुळे शॉक लागून वसंतचा मृत्यू झाला.

दरम्यान, वसंत आणि त्याची पत्नी नुतन यांच्यात नेहमी वाद व्हायचे याच वादातून ही हत्या केली असावी, असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.