ACB Trap On Sanjeev Jadhavar | 50 हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्ह्याधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले; प्रशासकीय विभागात खळबळ

Sanjeev Jadhavar

पालघर : ACB Trap On Sanjeev Jadhavar | ५० हजार रुपयांची लाच घेताना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. (Palghar ACB Trap Case)

जमिनीचे प्रकरण मंजूर करून मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याने लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. तक्रारदार याचे वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी एक प्रकरण उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग संजीव जाधवर यांच्याकडे गेले होते. (Palghar Bribe Case)

या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, मात्र तरी देखील हे प्रकरण मंजूर करुन मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली.

या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१३) सापळा रचला. तक्रारदाराने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन उपजिल्हाधिकारी जाधवर यांना संपर्क केला.

त्यानंतर उपजिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची ५० हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संजीव जाधवर यांना रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बऱ्याच वेळपर्यंत सुरु होती. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातच कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनाच लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे.