Rupali Chakankar On Rohini Khadse | रुपाली चाकणकरांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर; म्हणाल्या – ‘स्वतःचं कर्तृत्व नसताना बापाच्या वशिल्यानं पदं, त्यांना…’
पुणे : Rupali Chakankar On Rohini Khadse | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) धामधूम सुरु झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मागेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती.
यावरून रूपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना डिवचले होते.
त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, आमच्याकडे सीडी आहे असे सांगून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला व अजूनही ती सीडी बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही.
अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे व इतरांवर टीका करणार्यांवरून त्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे? हे कळून येत आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचे कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवले, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर चाकणकर यांनी दिले आहे.