MLA Mahesh Landge | भाजपातला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; आमदार महेश लांडगेंना शहराध्यक्षांचे वावडे? प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

Mahesh Landg-Chandrashekhar Bawankule

चिंचवड : MLA Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड मधील भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. सध्या भाजपचे शहराध्यक्ष म्हणून शंकर जगताप (Shankar Jagtap) कार्यरत आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांना शहराध्यक्षांचे वावडे आहे का? म्हणत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर (Sachin Kalbhor) यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे केली आहे.

काळभोर म्हणाले, आमदार महेश लांडगे हे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा उल्लेख टाळतात. त्यांचा फोटो कुठेही वापरत नाही. पक्षाच्या बैठकीला देखील ते हजर राहत नाहीत, अशा पद्धतीने महेश लांडगे हे प्रोटोकॉल तोडतात, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊनही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड (Chinchwad Assembly) व पिंपरी विधानसभा मतदारसंघात (Pimpri Assembly) सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमासाठी भाजपचे कार्यकर्ते शंकर जगताप यांचे शहराध्यक्ष म्हणून फोटो फ्लेक्स छापतात. त्यामुळे चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांना शंकर जगताप परिचित आहेत.

तर भोसरी विधानसभा मतदारसंघात (Bhosari Assembly) शंकर जगताप यांच्या जाहिरात बोर्ड तसेच फ्लेक्सवर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल नियमानुसार फोटो छापला जात नाही किंवा टाळले जाते. त्यामुळे या मतदारसंघात शंकर जगताप हे शहराध्यक्ष आहेत की नाही? याची कल्पनाही सामान्य नागरिकांना नाही.

लोकसभा निवडणुकीत शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे फोटो जाहिरात बोर्डवर छापण्यात आले नव्हते. तसेच महेश लांडगे हे शंकर जगताप यांचे फोटो लावण्यात टाळाटाळ करतात, असे सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.

आमदार महेश लांडगे यांना वैयक्तिक पातळीवर लेखी पत्राद्वारे समजपत्र द्यावे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.