Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या सर्व्हेत 177 जागांवर अनुकूल परिस्थिती; मात्र बंडखोरी रोखण्याचे असणार आव्हान
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) ४८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले होते.
यामध्ये भाजपला (BJP) ९, शिंदे गटाला (Eknath Shinde Shivsena) ७ आणि अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) एका जागेवर विजय झाला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहता महायुतीसाठी आशादायक चित्र असल्याची चिन्हं दिसत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून करण्यात आलेला हा दुसरा सर्व्हे आहे. यामध्ये महायुतीला राज्यातील १७७ जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) आणि ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ या दोन लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. यापैकी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला सरकारकडून १५०० रुपये मिळणार आहेत.
तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा होऊ शकतो. याचाच इफेक्ट शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महायुतीसाठी अनुकूल वातावरण असले तरी या निवडणुकीत बंडखोरीला लगाम घालण्याचे मुख्य आव्हान महायुतीसमोर असणार आहे. त्यासाठी तिनही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर यंदा भाजपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरणार आहे. अतुल लिमये यांच्याकडे राज्यातील समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.