Dinkar Shinde Passes Away | ‘शिंदेशाही’तील गायकीचा हिरा हरपला; शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Singer Anand Shinde's Brother

मुंबई : Dinkar Shinde Passes Away | महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे (Anand Shinde Singer) यांचा भाऊ दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन झाले आहे. त्यांचा पुतण्या, गायक उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

दिवगंत गायक प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली. त्यांनी गायलेली आंबेडकरी गीते, कव्वाली, भक्ती गीते आजही लोक ऐकतात. प्रल्हाद शिंदे यांच्या गायकीचा हा वारसा आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे आदींनी पुढे नेला.

दिनकर शिंदे यांनी आंबेडकरी गीतांसह लोकगीतांच्या माध्यमातून आपला चाहता वर्ग निर्माण केला. युट्युबवर दिनकर शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या गीतांना लाखोंच्या घरात व्ह्यूज आहेत. अनेक गाणी चांगलीच गाजली असून कॅसेट्स, सीडीजची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली.

उत्कर्ष शिंदे याने आपल्या काकांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती, माणसे, मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशीही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला असल्याचे उत्कर्षने म्हटले.

तुम्हा सर्वांच्या संस्कारामुळेच आज हर्षद,आदर्श, उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढेही असेच शिंदे घराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना वि विल मिस यू, अशा शब्दांत उत्कर्षने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.