Pune Shiv Sena Leader Joins Congress | पुण्यात शिवसेनेच्या नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारीची शक्यता; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

nana-patole-uddhav-thackeray.

पुणे : Pune Shiv Sena Leader Joins Congress | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या आहेत. दरम्यान पुण्यातही मविआ (Mahavikas Aghadi) कडून रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान मविआत जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावरून इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे (Avinash Salve) यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी (दि.९) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

“काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी मी महाविकास आघाडीतच आहे. शिवसेनेने (उबाठा) (Shivsena UBT) माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. पुणे शहरात राजकीय वर्तुळात काम करताना काँग्रेसमध्ये अधिक संधी असल्याने या पक्षात प्रवेश केला आहे”, अशी प्रतिक्रिया अविनाश साळवे यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे.

साळवे यांच्या पक्षप्रवेशाने महाविकास आघाडीत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत साळवे हे पुणे कॅन्टोन्मेंट मधून उमेदवार ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र पुणे कॅन्टोन्मेंट मधून उमेदवारीचे दावेदार समजले जाणारे माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचा पत्ता कापला जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

साळवे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत गोपनियता पाळण्यात आली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाला फाटे फुटू नयेत, यासाठी काँग्रेसमधील एका गटाने पूर्ण काळजी घेतली. मुंबईत चेन्निथला यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच ही वार्ता राजकीय वर्तुळात पसरली.

भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर खासदार झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे बागवे हे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात बागवे गृहराज्यमंत्री होते.

मात्र, चव्हाण यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतरही बागवे काँग्रेसबरोबरच एकनिष्ठ राहिले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट मधून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे, तर गत दोन निवडणुकांमध्ये बागवे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि तो साळवे यांच्या रूपाने पूर्ण झाल्याचे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर साळवे यांचा काँग्रेस प्रवेश हा पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.