Pune News | दोन वर्षाचा आमोद पावसाच्या पाण्यात बुडाला; डॉक्टरांनी ‘सीपीआर’ दिला अन् तो वाचला!

Amod Thorve

पुणे : Pune News | २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आळंदी येथे राहणारा दोन वर्षाचा आमोद थोरवे हा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर गेला. मात्र बराच काळ होऊनही तो परत आला नाही. घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर तो साचलेल्या पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. हे पाहून घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला. (Pune Flood)

बेशुद्ध आमोदला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला सीपीआर CPR (chest compression resuscitation)
देण्यात आला. त्यानंतर हृदयाचे कार्य सुरु झाले. त्यानंतर अंकुरा हॉस्पिटलमध्ये (Ankura Hospital Aundh) त्याचे उपचार झाले आणि त्याचा जीव वाचला. (Pune Rains)

आमोदला आळंदीहून अंकुरा हॉस्पिटलमधील बॅग अँड ट्यूब व्हेंटिलेशनवर आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. त्यावेळी तो पूर्णतः बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या हृदयाची क्रिया देखील अतिशय कमकुवत होती आणि रक्तदाबही कमी झाला होता. त्याला कार्डियाक अरेस्टचा संकेत दिसू लागल्याने त्वरित उपचार सुरू केले.

सलग चार तासांच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांच्या संपूर्ण पथकाला त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले. या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या तब्बल ३० हून अधिक जणांच्या पथकाने चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी योगदान दिले.

यांनतर १८ तासांच्या आत त्याचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला. त्याचा मेंदू किंवा इतर अवयव सुस्थितीत असल्याने ३६ तासांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. अंकुरा हॉस्पिटलमधील ज्येष्ठ नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य, आपत्कालीन विभागातील डॉ. चिन्मय जोशी, बालरोगतज्ज्ञ डॉ. विश्रुत जोशी, नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. निखिल झा या चमूने आमोदवर यशस्वी उपचार केले.

“हृदयविकाराच्या वेळी सीपीआर विषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. जेव्हा हृदय कार्य करणे थांबवते, तेव्हा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबतो, ज्यामुळे मेंदूचे नुकसान होते किंवा काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो.

सीपीआर हा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत करतो. हृदयविकाराच्या स्थितीत, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो आणि सीपीआर प्रशिक्षण घेतल्याने एखादा अमूल्य जीव वाचविता येतो”, अशी माहिती डॉ. चिन्मय जोशी, पेडियाट्रिक इन्सेस्टिव्हिस्ट, अंकुरा हॉस्पिटल’ यांनी दिली आहे.