Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी? नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

नवी दिल्ली : Delhi-Mumbai Expressway | देशातील सर्वात मोठा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी खुला होणार, याची प्रतीक्षा कोट्यवधी भारतीयांना आहे. विशेषता, दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील रहिवाशांना. कारण, हा एक्स्प्रेस-वे या पाच राज्यांमधून जाणार आहे. भारतातील या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वेची डेडलाईन सातत्याने वाढत गेली आहे.
परंतु, आता संसदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या शुभारंभाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी संसदेत म्हटले की, या एक्स्प्रेस-वे चे काम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेमध्ये जवळपास निम्म्या पॅकेजचे काम जून 2024 पूर्ण होण्यासह 82 टक्के भागावर काम पूर्ण झाले आहे. गुजरातचे भाजपा खासदार नरहरी अमीन यांनी विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला गडकरी यांनी हे उत्तर दिले आहे.
किती काम पूर्ण, किती बाकी?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे चे काम सुरू आहे. 1386 किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेस-वेच्या 1136 किलोमीटर भागाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भागाचे काम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. मंत्रालयाने 1,386 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे चे काम 53 पॅकेजमध्ये सुरू केले आहे. जून 2024 पर्यंत एकुण 26 पॅकेज पूर्ण झाले आहेत.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे ची वैशिष्ट्ये
देशातील हा महत्वाचा रोड प्रोजेक्ट आहे. हा एक्स्प्रेसवे दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी आणखी सोपी करणार आहे. यातून देशातील 2 महानगरांसह महत्वाच्या शहरांमध्ये प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होईल, ज्यातून इंधन आणि लॉजिस्टिक खर्चात बचत होईल.