Pimpri Chinchwad Police | ट्रान्सफार्मर चोरणारी टोळी गजाआड ! चोरीचे 16 गुन्हे असलेल्या म्होरक्यासह 6 जणांना अटक; महाळुंगे पोलिसांची कामगिरी

पिंपरी : ग्रामीण व औद्योगिक भागातील विद्युत पारेषण विभागाचे ट्रान्सफार्मर चोरुन त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्यांची विक्री करणार्या टोळीला पकडण्यात महाळुंगे पोलिसांनी यश आले आहे. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात चोरीचे १६ गुन्हे असलेल्या म्होरक्यासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
रमेश ऊर्फ राहुल बाळु पडवळ (वय २७), सुनिल ऊर्फ सैराट शिवाजी गावडे (वय २१, दोघे रा. निमगांव दावडी, ता. खेड), सुनिल सुरेश गावडे (वय २३), रवींद्र सुरेश गावडे (वय २३, दोघे रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव), उस्मान बिलाल अब्दुल अब्बुहरेरा (वय २०, रा. भांबोली, ता. खेड), कार्तिक नामदेव पवार (वय २५, रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रमेश पडवळ याच्यावर पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. सुनिल ऊर्फ सैराट याच्यावर चोरीचे ३ गुन्हे तर, सुनिल सुरेश गावडे याच्यावर चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजार रुपयांची ३४० किलो तांब्याचे तारा व पट्या, ५ लाख २५ हजार रुपयांच्या गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींकडून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ट्रान्सफार्मर चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, चाकण पोलीस ठाणे आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात शेती व नवीन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागाने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफार्मर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शेतकरी व औद्योगिक वसाहतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जलदगतीने तपास करण्याच्या सुचना वेळोवेळी दिल्या होत्या. या ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना निर्जन व दुर्गम भागात होत असल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळून येत नव्हता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी ट्रान्सफार्मर चोरीचा कालावधी, वार, वेळ, याचा बारकाईने अभ्यास करुन परिसरात संशयितरित्या वावरणारे लोकांची माहिती प्राप्त केली. चोरीबाबत घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी ट्रान्सफार्मरमधील तांब्यांचे तारा चोरल्याची कबुली दिली. ट्रान्सफार्मर खोलण्यासाठी वापरलेले साहित्य, लहान मोठ्या आकाराचे पान्हे, पक्कड, हातोडी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली चोरीची इंडिका कार व पाच दुचाकी वाहने असा माल जप्त केला आहे.
आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत
निर्जन व दुर्गम भागात असलेल्या शेती तसेच नविन तयार होत असलेल्या औद्योगिक वसाहतीचे ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर हेरुन रात्रीच्या वेळी त्यास असलेले डि ओ चा खटका बंद करुन त्यातील विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट करत. ट्रान्सफॉर्मर बॉक्स खाली पाडून त्यातील तांब्यांचे तारा चोरुन नेत.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी शेती व निर्जन ठिकाणांचे जवळील ट्रान्सफॉर्मर चे ठिकाणी कोणी अनोळखी व्यक्ती वावरत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल बढेकर, अमोल बोराटे, प्रकाश चाफळे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांच्या कार्यालयातील पोलीस हवालदार राजू जाधव यांनी केली आहे.