Lohgad Fort Landslides | लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा; भूस्खलन होण्याचा धोका; लोहगड व धालेवाडीतील ग्रामस्थ भयभीत

मावळ: Lohgad Fort Landslides | किल्ले लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा गेल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. लोहगड गावात डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरड कोसळण्याच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भेगा दिसताच गुराख्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले. यावेळी तलाठी यांनीही पाहणी केली आहे.

किल्ले लोहगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड व धालेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लोहगड गावामध्ये सुमारे ५०० ते ६०० लोकवस्ती असलेले गाव असून तर धालेवाडी गावामध्ये २५० ते ३०० लोकवस्ती असलेले गाव आहे.

याठिकाणी सन १९८९ साली मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन लोहगड येथील तीन ते चार घरे यामध्ये गाडली गेली होती. तर अनेक जनावरे मृत पावले होते. तसेच सन २००६ साली याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन धालेवाडी येथील शेतकऱ्यांची भात शेती यामध्ये गाडून गेली होती.

” मी व प्रांतसाहेबांनी लोहगड येथील डोंगरावरील भेगांची पाहणी केली असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. तसेच याबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल”, अशी माहिती मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे.