Maharashtra Politics News | अजित पवारांना मोठा धक्का ! माजी आमदाराचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, म्हणाले – ‘भाजपा, शिवसेनेसोबत काम करणे अवघड’

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात विविध राजकीय घडामोडी आता सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आता शरद पवार गटाकडे (Sharad Pawar NCP) इनकमिंग सुरू झाले आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) हे शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. दुर्राणी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी स्वतः ही माहिती दिली.
बाबाजानी दुर्राणी हे परभणीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असून ते विधान परिषदेचे आमदार होते. मागील महिन्यात त्यांची आमदारकीची टर्म संपली. यानंतर दुर्राणी यांनी पुन्हा तिकीट मागितले पण अजित पवारांनी त्यांना संधी दिली नाही.
शरद पवार यांनी दुर्राणी यांना २००४ आणि त्यानंतर २०१२-२०१८ अशी दोनवेळा विधान परिषदेवर संधी दिली होती. यंदा अजित पवारांनी दुर्राणी यांना डावलून परभणीतील (Parbhani) राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना तिकीट दिल्याने दुर्राणी नाराज होते.
आपल्या घरवापसीबाबत माहिती देताना बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की, मी साहेबांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे. १९८५ पासून मी शरद पवारांसोबत काम करत आहे. मध्यंतरी वेगळी वाट निवडली. पण समविचारी पक्षांसोबत काम करणे योग्य आहे. कार्यकर्ते, मतदारांमध्ये मतभेद निर्माण होतात, तिथे काम करण्यास कार्यकर्ते आणि नेत्यालाही अवघड होते.
दुर्राणी म्हणाले, भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena Eknath Shinde) यांच्यासोबत काम करणे कार्यकर्ते आणि आमच्या मतदारांनाही अवघड जात आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. नेहमी धर्मनिरपेक्ष विचाराने काम करत आलो. अजित पवार फुले-शाहू-आंबेडकरी विचाराने काम करत असले तरी त्यांच्यासोबत दोन पक्ष असल्याने अल्पसंख्याक विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणे अवघड जात आहे.
पक्ष प्रवेशाबाबत बाबाजानी दुर्राणी म्हणाले, कोणतेही आश्वासन नव्हे, तर विचारसरणीच्या आधारे मी पुन्हा प्रवेश केला आहे. देशात मुस्लीम समाजाची कुंचबणा होत आहे. जे भाजपासोबत आहेत अशांनाही मतदान करायला त्यांचे पारंपारिक मतदार तयार नाहीत. त्यामुळे अशा पक्षांसोबत राहणे, काम करणे शक्य नाही. त्यामुळे मी यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार आहे.