Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

पुणे : Pune Rainfall Update | पुण्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक रहिवासी वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील काही सोसायट्यांमध्ये छाती इतके पाणी साठले आहे तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
त्यातच आता हवामान विभागाकडून (IMD) पुण्यासाठी पुन्हा धोक्याची घंटा आहे. कारण पुढच्या चोवीस तासात पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये येत्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह घाट परिसरात जोरदार पाऊस पडू शकतो. पुण्यात पावासाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरेबियन समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुण्यामध्ये पावसाची बॅटिंग सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढचे चोवीस तास सतर्क राहावे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.
पुण्यातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती लक्षात घेता पुण्यातील शाळा, महाविद्यालयानंतर आता सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातील खिलारेवाडी (Khilarewadi) भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुण्यातील खिलारे वाडी येथे पाणी साचल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सहायता करत त्यांना आधी घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
मागील चोवीस तासात विविध भागात झालेल्या पावसाची नोंद खालीलप्रमाणे,
लवासा – ४५३ मिलिमीटर
लोणावळा – ३११ मिलिमीटर
चिंचवड – १७५ मिलिमीटर
शिवाजीनगर – ११४ मिलिमीटर
एनडीए – १६७ मिलिमीटर
तळेगाव – १६७ मिलिमीटर
वडगाव शेरी – १४० मिलिमीटर