Karve Nagar Pune | कर्वेनगर मधील समर्थ पथ, विठ्ठल मंदिर रस्त्यावरील सोसायट्या, ताथवडे उद्यान समोर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी; संदिप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Karve Nagar Pune | भारतीय जनता पाटी, महाराष्ट्र प्रदेश, प्रवक्ता संदिप खर्डेकर यांनी शहरातील सोसायट्यांमध्ये साचणार्या पावसाच्या पाण्याच्या समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच सा समस्येवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी म्हंटले आहे की, दोन वर्षांपासून समर्थ पथावरील प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील चिंतामणी, गंगानगरी, मोरयाकृपा व अन्य सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे. येथे असलेल्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरत असून थोडा मोठा पाऊस झाला की येथील सर्व भागात पाणी साचते व सोसायट्यांचे पार्किंग पाण्याने भरून जाते व वीज मीटर खाली असल्यामुळे वीज देखील बंद करावी लागते व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गतवर्षी रात्री उशिरापर्यंत थांबून स्वतः तत्कालीन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे पाणी उपसण्याच्या कामात लक्ष घातले होते तर यावर्षी देखील 8 जून ला अशीच परिस्थिती उद्भवली होती व मी आपणास सतर्क केले होते.
तसेच विठ्ठल मंदिर रस्त्यावर स्नेह म्हाडा सोसायटी, कुमार परितोष सोसायटी, शहीद मेजर ताथवडे उद्यानासमोरील मधुसंचय समोरील गल्ली तील बंगले व सोसायटीत तसेच नदीपात्राजवळील राजपूत वीटभट्टी, खिलारेवाडी, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करून पाणी उपसा करत आहे. मात्र यंत्रणा देखील कमी पडत आहे. येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे. आत्ताचा पाऊस ओसरल्यावर केवळ ह्या भागातच नाही तर शहरातील अश्या सर्व ठिकाणाची पाहणी करून पाणी साचणार नाही यासाठी काय करता येईल यावर तज्ञाचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश संदिप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी केली आहे.