Ajit Pawar On Pune Traffic Issue | पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनविण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – अजित पवार
मुंबई : Ajit Pawar On Pune Traffic Issue | शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त (Pune Traffic Jam) शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात सर्वंकष आढावा घेतला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) , नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता (Asim Kumar Gupta) , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar), पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) उपस्थित होते. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar), पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे (Yogesh Mhase), पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज (Prithviraj B P) आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सादरीकरण केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर आणि परिसरातील औद्योगिक विकासामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींमुळे राज्याच्या विविध भागांतून पुणे शहरात नागरिक येत असतात. त्यामुळे पुणे शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून मागील काही वर्षात पुणे शहराची दुपटीने वाढ झाली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहरातील पायाभूत सोयीसुविधांवर कमालीचा ताण येऊन स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कोणत्याही परिस्थितीत सुटका झाली पाहिजे. त्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुरुवातीला कमी खर्चाच्या, कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्यात येईल. त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था सुरु करणे, रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढणे, सिग्नलची वेळ कमी करणे, सिग्नलविरहित वाहतूक व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, मिसिंग लिंक्स जोडणे आदी उपाययोजना कराव्यात.
पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांचा विस्तृत प्रस्ताव पाठवावा. त्याअनुषंगाने महापालिकेने पुणे ते कात्रज रस्त्यावरील नवले जंक्शन येथील अतिक्रमण हटविण्यात यावे. त्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. नवले ब्रिज, कोरेगाव पार्क, एबीसी चौक आदी ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ही समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर विकास प्राधिकरण आदी यंत्रणांनी समन्वयाने काम करत पुणेकरांची या समस्येतून सुटका करावी. त्यासाठी या यंत्रणांच्या वाहतूकविषयक तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.