Shivsena Eknath Shinde | आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गट शरद पवारांचा फार्म्युला वापरणार?; रणनीती ठरली
मुंबई : Shivsena Eknath Shinde | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मविआ (Mahavikas Aghadi) तसेच महायुतीतील (Mahayuti) पक्ष मतदारसंघांवर दावे करताना दिसत आहेत. मात्र कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र सध्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे ती जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी चर्चा सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. (Sharad Pawar Formula)
दरम्यान या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. विधानसभेसाठी शिंदे गटाकडून शरद पवार फार्म्युला वापरला जाणार आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लिमिटेड जागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखण्यात आली आहे. विधानसभेसाठी १०० जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे.
आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडली, ज्यामध्ये विधानसभेच्या फक्त १०० जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी राज्यातील शंभर जागा निवडल्या असून त्या जागांवर जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जागांवर निरीक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. महिला आघाडीसंदर्भातील पदे देखील भरण्यास सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने केवळ १० जागा लढवल्या होत्या. या १० पैकी ८ जागा शरद पवार गटाने जिंकल्या. त्याचप्रमाणे लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे.