Vishalgad Violence | विशाळगड जाळपोळ प्रकरणी रवींद्र पडवळच्या अटकेसाठी पोलिसांची पथके पुण्याला रवाना

कोल्हापूर : Vishalgad Violence | माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी गडावरील अतिक्रमण (Vishalgad Encroachment) हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून त्या अंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता. पण संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच तेथील परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांनी कारवाई सुरु केलेली आहे.
पुण्यातील हिंदू बांधव समितीचे अध्यक्ष रवींद्र पडवळ (Ravindra Padwal) यांच्या आवाहनानुसार विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचलेल्या शेकडो तरुणांनी तोडफोड करून दहशत माजवली. जमावाला चिथावणी देणारे पडवळ यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके पुण्याला रवाना झाली आहेत. दंगलीसाठी कारणीभूत ठरलेले पडवळ यांच्यासह दंगलखोरांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती त्यांच्या समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावर आणि पायथ्याला तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून पुण्यातील रवींद्र पडवळ यांनी कार्यकर्त्यांना रविवारी सकाळी गडावर येण्याचे आवाहन केले.
कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडिओंमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणा-यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो तरुण पन्हाळा-पावनखिंड मोहिमेच्या निमित्ताने दोन दिवस आधीच कोल्हापुरात पोहोचले होते. रविवारी सकाळी ते विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले. यामुळे वाढलेला जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. संशयितांच्या अटकेसाठी आठ पथके तैनात असून, यातील काही पथके रवींद्र पडवळ यांच्या मागावर पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, पडवळ हे मोबाइल बंद करून गायब आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली. सेवाव्रत संस्थेचे प्रमुख बंडा साळोखे आणि त्यांच्या साथीदारांवरही अटकेची कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.