Manorama Khedkar | पिस्तुलानंतर रात्रीच्या अंधारात दांडे अन् कुऱ्हाडी, IAS मॅडमच्या आईचा आणखी वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल (Video)

पुणे : Manorama Khedkar | वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Puja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन पौड पोलिसांनी (Paud Police Station) मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आता असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या मेट्रो अधिकारी आणि पुणे पोलिसांसोबत हुज्जत घालत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पोलिसांनीच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला आहे.
हा प्रकार 2022 मधील आहे. बाणेरमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात खेडकर यांचा ओमदीप बंगला आहे. त्या बंगल्यासमोरुन मेट्रो जात आहे. या कामावरुन मनोरमा आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा वाद घातला होता. मेट्रो कामासाठी आणलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी तेथील फुटपाथवर उतरवले होते. यावरुन मनोरमा आणि कुटुंबियांनी वाद घातला होता. या वादानंतर पोलिसांनी बोलवण्यात आले होते. व्हायरल व्हिडीओत त्याठिकाणी पोलीस दिसत असून एक महिलाही जोरजोराने भांडताना दिसत आहे.
तुम्ही कायदा हातात घेत दांडे आणि कुऱ्हाडी घेऊन येताय मग कोणाला सांगायचे. आम्ही कशासाठी आलोय. तुमचे काम नाही का आमच्याशी बोलायचे, असा सवाल पोलीस मनोरमा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. पोलीस (Pune Police) त्यांना विचारत असताना एक तरुण येऊन त्यांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी कॅमेऱ्यासमोर हात धरताना दिसत आहे. मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरु केल्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चतुश्रृंगी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याठिकाणी आले. मात्र, मनोरमा यांनी पोलिसांसोबत वाद घातला.