Pune Rains | पुणे शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता; आजपासून पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

Mansoon-5

पुणे : Pune Rains | राज्यात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होईल यासाठी पोषक हवामान होत आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. आजपासून (दि. १२) अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहराच्या परिसरातील घाटमाथ्यावर काही भागात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी घाटमाथ्यावर पावसाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात मंगळवारपासून दि.९ पासून पावसाने उघडीप घेतली आहे. पावसाची एखादी सर हजेरी लावत आहे. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फक्त ०.७ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. शहरात १ जुलै ते ११ जुलै दरम्यान २८९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या दरम्यान शिवाजीनगरमध्ये सरासरी २२४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा ६५. ९ मिलिमीटर जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पाण्याची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांची नजर पावसाकडे लागलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यासह सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आजपासून (ता. १२) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मुंबई उपनगर येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेथेही वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ खात्याने दिला आहे. मात्र, राज्यातील उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप घेतली आहे.

मॉन्सून आता सर्वसाधारण स्थितीवर पोहचला असून, हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून जयपूर, ओराई, बलिया, असनसोल, बागती ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली