Maharashtra ATS Arrested Sanjay Rao | माओवादी संजय राव याला ATS ने ठोकल्या बेड्या, शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याचा आरोप

Maoist Sanjay Rao

पुणे : Maharashtra ATS Arrested Sanjay Rao | शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनिटने संजय राव उर्फ विजय उर्फ दीपक (वय 60, रा. अंबरनाथ, ठाणे) याला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातून अटक केली आहे. केंद्र शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी अशी संजय राव याची ओळख आहे. राव याने वेगवेगळ्या नावांचा वापर करुन तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात माओवादी विचारधारेचा प्रसार केला असून त्याचे डीएनए प्रोफाइलिंग करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती एटीएसने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुरुवारी केली.

माओवादी चळवळीचा नेता कोनाथ मुरलीधरन ऊर्फ थॉमस (वय 61, मूळ रा. कोची रिफायनरीजवळ, जि. एर्नाकुलम, केरळ ) तसेच साथीदार इस्माइल हमजा सीपी उर्फ जेम्स मॅथ्यू (रा. वाला रँड, पांडीकांड, जि. मलपूरम, केरळ) यांना एटीएसने 8 मे 2015 मध्ये अटक केली होती. तपासात दोघे जण बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटनेचे सदस्य असल्याचे उघड झाले. शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ते भूमिगत राहून काम करत होते.

या प्रकरणात त्यांचा साथीदारी संजय राव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर राव फरार झाला होता. त्याचे साथीदार कोनाथ आणि इस्माइल यांच्याविरुद्ध एटीएस ने 14 ऑक्टोबर 2015 मध्ये आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर कोनाथ आणि इस्माइल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

संजय राव फरार झाल्यानंतर त्याने भूमिगत राहून माओवादी विचारधारेचा प्रसार केला. त्याला मागील वर्षी तेलंगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून पिस्टल जप्त करण्यात आले होते. दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या राव याला हैदराबाद येथील चेरापल्ली कारागृहातून एटीएसने ताब्यात घेतले. त्यानंतर एटीएस ने त्याला अटक करुन शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
राव बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे काम भूमिगत राहून करत आहे. वेगवेगळ्या राज्यात तो बनावट नावाचा वापर करुन वास्तव्य करत होता. त्याच्याकडून वेगवेगळी नावे असलेली आधार कार्ड जप्त केली आहेत. त्याने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. राव त्याची ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करत असून, अशा परिस्थितीत त्याची डीएनए चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घ्यावे लागणार आहेत, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले. याबाबत एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष दुधगावकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

राव याचे वकील अॅड. रोहन नहार आणि अॅड. पार्थ शहा यांनी राव यांच्या डीएनए चाचणीला विरोध केला. एटीएसकडून दाखल केलेल्या अर्जावर 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.