IAS Puja Khedkar | पूजा खेडकर यांची केंद्राकडून चौकशी; राज्याकडूनही अहवाल पाठवला जाणार

पुणे : IAS Puja Khedkar | भारतीय प्रशासकीय सेवेतील वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रसरकारने एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे.
खासगी वाहनावर लाल दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) पूजा खेडकर यांची चौकशी सुरु केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातून नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारांतून खेडकर यांची नियुक्ती झाली आहे. ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान देण्यात आले होते. न्यायाधिकरणाने खेडकरांविरोधात निर्णय दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी बहुविकलांगतेबाबत स्वतःहून तपासणी केलेले एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आल्याचेही समोर येत आहे. या बाबी तसेच त्यांची कार्यालयातील गैर वर्तवणूक यांची चौकशी होणार आहे.
पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर लाल दिव्याचा वापर केल्याने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई पुणे पोलिसांनी सुरु केली आहे.