Female Police Accident In Pune | पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात अपघात, महिला पोलीस कर्मचारी जखमी

police

पुणे : Female Police Accident In Pune | पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढत आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी काही वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेकदा अपघात होऊन काहीजण जखमी देखील झाले आहेत. पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात (Dnyaneshwar Paduka Chowk) विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पियागो वाहनाची दुचाकीला धडक बसून एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. (Pune Crime News )

सुनिता सुनील कडुसकर (वय-40 रा. राम कदम चौक, त्रिमुर्ती निवास, बाणेर) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याबाबत चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पियागो वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(ब), 324(4), मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 119/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार दत्तात्रय रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता कडुसकर या खडक पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आहेत. बुधवारी (दि.10) सकाळी दहाच्या सुमारास त्या दुचाकीवरुन कर्तव्यावर जात होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातून जात असताना वळणावर समोरुन भरधाव वेगात एक पियागो वाहन आले. वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी निष्काळजीपणे विरुद्ध बाजूने भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या गाडीला जोरात धडक दिली. यामध्ये सुनिता कडुसकर यांचा पाय फ्रॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रेड्डी करीत आहेत.