Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

नवी दिल्ली : Tomato Price Hike | पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने विविध शहरात टोमॅटोचे दर वाढून ९० ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. याचा परिणाम कोट्यवधी घरांच्या बजेटवर होत आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसारख्या महानगरांसह अनेक शहरात टोमॅटोचा दर १०० रुपये प्रति किलो झाला आहे.
टोमॅटोचे दर वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडु आणि केरळात उष्णता वाढणे आणि टोमॅटोचे पिक कमी होणे, मानले जात आहे. एका रिपोर्टनुसार कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या मोठ्या टोमॅटो उत्पादक राज्यात उष्णता वाढल्याने टोमॅटोची आवक ३५ टक्के पर्यंत कमी झाली आहे.
जास्त पाऊस देखील टोमॅटोचे दर वाढण्यास कारणीभूत आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेशात जास्त पावसामुळे रस्ते खराब झाल्याने मोठ्या शहरांपर्यंत टोमॅटो पोहचण्यात अडचण येत आहे. मागच्या वर्षी अति पावसामुळे आणि पुरामुळे काही ठिकाणी टोमॅटोचा दर ३५० रुपये किलोवर गेला होता.
सध्या खरीप हंगामातील टोमॅटो बाजारात येत आहेत. हळुहळु ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये नवीन पीक बाजारात येण्यास सुरूवात होईल, यानंतर दरात घसरण होण्याची शक्यता आहे. जर मागणी कमी झाली आणि पुरवठा वाढला तर टोमॅटोचे भाव खाली येऊ शकतात. तसेच मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा सरकारने खुल्या बाजारात सरकारी एजन्सीज द्वारे टोमॅटोची विक्री केली तर दर खाली येऊ शकतात. सरकार यासाठी किमान आधारभूत मूल्य वाढवू शकते अथवा टोमॅटो आयात करू शकते. याद्वारे दर नियंत्रित करण्यात मदत होईल.