Bachchu Kadu | “… तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल” ; बच्चू कडूंचा सूचक इशारा
मुंबई : Bachchu Kadu | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राजकीय पक्षांची तयारी सुरु झालेली आहे. याबाबत दौरे, भेटी, बैठका वाढल्याचे चित्र आहे. असे असतानाच राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. मी शिंदे सरकारवर (Shinde Fadnavis Govt) नाराज नाही पण या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी (Third Front) उघडावी लागेल असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. बच्चू कडू हे सध्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत.
बच्चू कडू म्हणाले, “मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीद्वारे आम्ही १५ ते १७ जागा या विधानसभेला लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, जे अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी तसा निर्णय घ्यावा लागेल”, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आम्ही रविकांत तुपकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. येत्या निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीचा आम्ही विचार करत आहोत, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यांच्या ज्या योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. पण त्यासोबतच त्याची जाहिरात त्यांच्या पक्षासाठी होऊ नये ही आमची भूमिका आहे, असे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.