Vetal Tekdi Pune | पुणे: वेताळ टेकडीवर दुचाकी चालवली तर होणार कारवाई, 5 कॉलेज तरुणांना घेतलं ताब्यात

पुणे : – Vetal Tekdi Pune | वेताळ टेकडीवर अनेक तरुण दुचाकी घेऊन येतात. गाडीचा आवाज करतात आणि त्यामुळे वन्यजीव व टेकडीवर फिरायला येणाऱ्यांना याचा त्रास होतो. विकेंडला शनिवार आणि रविवारी यामध्ये जास्तच भर पडते. मात्र, आता वेताळ टेकडीवर दुचाकी घेऊन येणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी पाच कॉलेज तरुणांना वन विभागाने ताब्यात घेऊन वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई केली आहे.
वेताळ टेकडीवर दुचाकी घेऊन जाण्यास बंदी आहे. कारण टेकडी ही वन विभागाच्या अंतर्गत येते. मात्र, काही अतीउत्साही तरुण थेट दुचाकी वन क्षेत्रात नेतात. त्याठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करतात. अशा तरुणांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी खास हेल्पलाईन नंबर वन विभागाने दिला आहे. नागरिकांनी देखील याबाबत दक्ष राहून असा प्रकार कोणत्या टेकडीवर दिसला तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली.
वेताळ टेकडीवर रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी काही तरुण दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी त्या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले. तीन दुचाकीवरुन हे तरुण आले होते आणि तेथील नागरिकांशी हुज्जत घालत होते. दुचाकीचा हॉर्न देखील मोठ्याने वाजवत होते. त्यामुळे पाच जणांना वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे सर्व कॉलेजला जाणारे आहेत. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार ताब्यात घेऊन चौकशी केली.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या सुचनेनुसार सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनरक्षक कृष्णा हाकके, दयानंद पंतवाड व धनाजी साळुंखे यांच्या पथकाने केली.
या क्रमांकावर संपर्क साधा
वेताळ टेकडीवर दुचाकी घेऊन जाऊ नये, खाणीमधील पाण्यात कोणीही उतरू नये. कारण त्या ठिकाणी जीवितास धोका होऊ शकतो. कोणाला असे आढळून आले तर त्यांनी वन विभागाच्या 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.