Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक; 2 तलवार, चॉपर जप्त

8th July 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | चिंचवड येथील चाफेकर चौकातील एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.7) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील रेल्वे रुळाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत केली. आरोपींकडून दोन लोखंडी तलवार, चॉपर यासह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. (Arrest In Attempt To Robbery)

याबाबत पोलीस शिपाई पंकज कैलास भदाणे (वय-30) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. सुनिल मारुती लोणी (वय-22 रा. बिजलीनगर, चिंचवड), सलीम मोहम्मद बागवान (वय-24 रा. चिंचवड नगर, चिंचवड), काशीनाथ कल्याण उकली (वय-24 रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) यांना अटक केली आहे. तर जोयबा बागवान (रा. दगडोबा चौक, चिंचवड), मयुर सुरवळे (रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) यांच्यावर भा.न्या. सं. कलम 310(4), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुनील लोणी याने शनिवारी (दि.6) कोयता हवेत फिरवून बिजलीनगर येथे दहशत पसरवली होती. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, चिंचवड स्टेशन येथील रेल्वे रुळाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण बसले असून त्यांच्याकडे धारदार शस्त्र आहेत. शस्त्राचा धाक दाखवून कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोन जण पळून गेले. तर तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून दीड हजार रुपये किमीतीच्या दोन तलवार, चॉपर, कटावणी, मिरची पूड, रस्सी, मास्क असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, चाफेकर चौकातील सोनिगरा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालणार असल्याची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.