Hadapsar Pune Crime News | पुणे : कोयत्याने वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

8th July 2024

पुणे : – Hadapsar Pune Crime News | हडपसर भागात टोळक्याने संकेत विहार सोसायटी परिसरात कोयते उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. संकेत विहार सोसायटी परिसरात गुरुवारी मध्यरात्री टोळके आले. त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. टोळक्याने कोयते उगारून वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) चार जणांना अटक केली आहे. (Arrest In Vandalism Of Vehicles)

करण निवृत्त तांबे ऊर्फ केटी (वय 19, रा. चंदननगर, पुणे), मायकल अशोक साळवे (वय 21, रा. मांजरी, पुणे), रेहान ख्वाजा शेख (वय 18, रा. वडगावशेरी, चंदननगर, पुणे), सागर भीमराव बोर्डे (वय 20, रा. सातवनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत विहार, फुरसुंगी परिसरात 4 जुलै रोजी हवेत कोयता भिरकावत, लोखंडी शस्त्रांनी वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली होती. तोडफोड करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वडगाव शेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.