Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक

रायगड : Raigad ACB Trap | रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे केलेल्या बांधकामेचे देयक मंजूर करण्यासाठी 81 हजार रुपयांची लाच घेताना विद्यापीठाचे वित्त अधिकाऱ्याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ओंकार रामचंद्र अंबपकर Omkar Ramchandra Ambakar (वय 55 रा. आनंद नगर, डी 103, लोणेरे, माणगाव, रायगड) असे लाच घेताना पकडलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.5) अंबपकर याच्या कार्यालयात करण्यात आली. (Bribe Case)
याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने रायगड एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचे बांधकाम केले होते. तक्रारदार यांचे 19 लाख 42 हजार 838 एवढ्या रकमेचे मंजूर केलेले बांधकाम बिल व 47 लाख 74 हजार 034 रुपये रकमेचे बांधकाम बिल मंजूर करण्यासाठी ओंकार अंबपकर याने एक लाख रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांनी याबाबत एसीबी कडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता ओंकार अंबपकर यांने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 81 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ वित्त विभाग येथील त्यांच्या कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहायक फौजदार विनोद जाधव, अरूण करकरे, पोलीस अंमलदार महेश पाटील, चालक पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या पथकाने केली.