Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार?; काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) चांगल्या जागा मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून जरी आगामी विधानसभा निवडणूका एकत्र लढण्याची भूमिका घेतलेली असली तरी जागावाटपात वाद निर्माण झाल्यास ‘एकला चलो रे’ चा नारा देत स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारीही काँग्रेसकडून सुरु झाल्याचे चित्र आहे. पुण्यातील आठही जागांवर तयारी करण्याची सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिलेल्या असून या मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी दिलेला माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेनुसार कसबा (Kasba Assembly), पर्वती (Parvati Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly), हडपसर (Hadapsar Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly) आणि खडकवासला (Khadakwasla Assembly) या विधानसभा मतदार संघामधून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ५ ऑगस्टपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर हे इच्छुकांचे अर्ज वरिष्ठांकडे सोपवण्यात येतील.
एकीकडे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे त्यांचे नेते सांगत असले तरी दुसरीकडे सर्वात आधी पुण्यातून इच्छुकांची अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुठेतरी भविष्यात ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे शहरातील ८ विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) ६ जागांवर आपला दावा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) देखील ६ जागांवर महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. यामध्ये काँग्रेसकडून अद्याप तरी अधिकृत जागांबाबत कोणतीही जाहीर वाच्यता करण्यात आली नसली तरी थेट ८ विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकी वेळी देखील काँग्रेसकडून अशाच प्रकारे इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी तब्बल २० इच्छुकांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. याच अर्जातून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची निवड करून काँग्रेसने उमेदवारी घोषित केली होती.