Shivsena UBT Vs Eknath Shinde | ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदेंना खुले आव्हान, ”सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”

मुंबई : Shivsena UBT Vs Eknath Shinde | आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल टी-२० विश्वचषकात विजय मिळवलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या विधानभवनातील सत्कार सोहळ्यात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला होता. यावर ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे.
गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आव्हान दिले आहे. पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सामना संपलेला नाही. विधानसभेची निवडणूक पूर्ण होईल, त्या दिवशी सामना संपेल. मग त्या दिवशी कळेल की कोणी कोणाची विकेट घेतली.
कोणी कोणाला निवृत्त करायला भाग पाडले. कोणाला जनतेने नाकारले. मला असं वाटतं की, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील त्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल, असे दानवे म्हणाले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे…
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माझ्या आधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच बॅटिंग केली. आमचे राजकारण क्रिकेटसारखेच आहे. यातही कुणी, कुठे, कशी विकेट घेईल काही सांगता येत नाही. जसे सूर्यकुमारचा कॅच कुणी विसरू शकत नाही, तसे आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करतोय.
क्रिकेटपासून लोकांना जो आनंद मिळतो, तसाच आनंद राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर खुलावा, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट हा खेळ कुठल्याही जाती-धर्माचा नाही. आमच्या राजकीय क्षेत्रात मात्र कोण कधी कुणाला बाद करेल, कुणाला रन आऊट करेल, हे सांगता येत नाही, असे शिंदे यांनी म्हटले होते.