Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा, सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)

Pimpri Chinchwad Cyber ​​Cell

पिंपरी : Pimpri Chinchwad Cyber Cell | कर्जाची रक्कम फेडण्यासाठी गुजरातमधील एका व्यक्तीने परदेशातील इतर साथीदारांच्या मदतीने दिघी येथील एका व्यक्तीची दोन कोटी 45 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती (Cheating Fraud Case). या प्रकरणात पिंपरी चिंचवड सायबर सेलच्या पथकाने गुजरातमधून आरोपीला अटक केली आहे. निकुंज अश्विनभाई मकवान Nikunj Ashwinbhai Makwan (रा. जातरुडा, वराछा ता. लीलया, जि. अमरेली सध्या रा. विक्रमनगर, सितानगर पुनागाम, सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन त्यांना शेअर मार्केट संदर्भात टिप्स देण्यात येत होत्या. या ग्रुपमध्ये जे इतर व्यक्ती होते त्यांना रोजच्या रोज नफा होत असल्याचे फोटो ग्रुपवर पाठवले होते. त्यामुळे तक्रारदार यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा झाली. त्यांनी ग्रुप अॅडमिनला संपर्क साधला. त्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी बँक खाते देऊन त्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तब्बल दोन कोटी 45 लाख 30 हजार रुपये गुंतवले. मात्र, कोणताही परतावा अथवा मुद्दल परत मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दाखल गुन्ह्याचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलच्या पथकाकडून करण्यात येत होता. पथकाने बँक अकाउंट व इतर तांत्रिक विश्लेषण केले असता बँक अकाउंट गुजरातमधील सुरत येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक सुरत येथे रवाना झाले. पथकाने केलेल्या तपासात बँक खाते श्री राधे इंटरप्रायजेश या नावाने असून अकाउंट धारक निकुंज मकवान असल्याची माहिती मिळाली. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणून चौकशी केली असता, व्यावसायात झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्याने हा गुन्हा परदेशातील व बाहेर राज्यातील साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्याविरुद्ध देशभरातून 56 तक्रारी प्राप्त झाल्या असून 4 कोटी 29 लाख 49 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले यांच्या पथकाने केली.