Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने भागिदाराची पावणे दोन कोटींची फसवणूक, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

पिंपरी :- Pune Pimpri Chinchwad Crime News | भागिदारीत असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने भागिदाराचा व त्याच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भागिदार व त्याच्या कुटुंबाची मिळकत बँकेकडे गहाण ठेवून त्यावर एक कोटी 65 लाख रुपयांचे कर्ज काढून बालेवाडीत (Balewadi) जमीन खेरेदी केली. ती जमीन फर्मच्या नावावर न करता स्वत:च्या नावावर करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police Station) पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 ऑक्टोबर 2022 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे घडला आहे.
याबाबत पिंपळे निलख येथे राहणाऱ्या 37 वर्षीय व्यावसायिकाने मंगळवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन गणपत बालवडकर Sudarshan Ganpat Balwadkar (वय-42), जानव्ही सुदर्शन बालवडकर (वय-36 दोघे रा. फ्लॅट नं. 503, सेलीब्रेशन अपार्टमेंट, मंत्रा मोनास समोर, बालेवाडी) यांच्या विरोधात आयपीसी 420, 406, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व आरोपी जानव्ही बालवडकर यांच्या भागिदारीत श्रीपती एंटरपायझेस नावाची फर्म आहे. या फर्मच्या नावाने न्यु डि.पी. रोड पिंपळे निलख येथे सी.एन.जी. पंप आहे. आरोपी सुदर्शन याने फर्मचा विस्तार वाढवण्यासाठी बालेवाडी येथे 5 गुंठे जागा फर्मच्या नावे घेऊ असे फिर्यादी यांना सांगितले. तसेच फिर्य़ादी व त्यांच्या परीवाराचा विश्वास संपादन केला. सुदर्शन यांनी फिर्यादी यांच्या नावावर असलेला फ्लॅट, वडिलांचा व भावाचा फ्लॅट फेडरल बँक शाखा विमाननगर येथे गहाण ठेवून 1 कोटी 65 लाख रुपये कर्ज घेतले.
कर्जाची रक्कम फर्मचा विस्तार करण्यासाठी न वापरता बालेवाडी येथे मंगलदास जैन यांच्या मालकीचे पाच गुंठे जागा 1 कोटी 55 लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, खरेदी केलेली जागा श्रीपती एंटरप्रायझेस या फर्मच्या नावे केली नाही. ती जागा आरोपींनी स्वत:च्या नावे करुन फिर्यादी व त्यांच्या परिवाराची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.