Shivsena Eknath Shinde | शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा आणखी एक प्रताप; ठेकेदाराकडून १५ टक्क्यांचं कमिशन मागितल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा

सोलापूर : Shivsena Eknath Shinde | शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ठेकेदाराकडून १५ टक्क्यांचं कमिशन मागितल्याप्रकरणी खंडणीचा (Extortion Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांनी ठेकेदाराकडून १५ टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, असे धमकावत मारहाण केल्याचा आरोप आहे. काळजे यांनी ठेकेदाराकडून ११ लाख रुपये मागितल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदार आकाश उत्तम कानडे याने सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात मनीष काळजे याच्याविरोधात फिर्याद दिली होती. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामासाठी ७६ लाखांची वर्क ऑर्डर निघाली होती. त्यासाठी आकाश उत्तम कानडे यांनी निविदा भरली होती. मात्र, काळजे यांनी ७६ लाखांवर १५ टक्क्यांच्या हिशोबाप्रमाणे ११ लाख रुपयांचं कमिशन देण्याची मागणी आकाश कानडे यांच्याकडे केली. आकाश उत्तम कानडे यांनी नकार दिल्याने काळजे यांनी दमदाटी, शिवीगाळ आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरविण्याची धमकी मनीष काळजे यांनी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी २ जुलै रोजी बारा वाजताच्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्या समवेत सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी काही वेळाने मनीष काळजे आणि त्यांचे चालक तेथे आले. त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटी मारल्याचा आरोप आकाश कानडे यांनी केला. दरम्यान या प्रकरणी सोलापूरच्या बाजार ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०८ (३), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये मनीष काळजे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही काळजे याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.