Hadapsar Pune Crime News | पुणे: पालखीत भाविकांचे मोबाईल व दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक, पोलिसांची हडपसर परिसरात कारवाई

Arrested-1-3
3rd July 2024

पुणे : – Hadapsar Pune Crime News | पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना हडपसर आणि वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station)अटक केली आहे.

दिपक अमरजीत सिंग (वय-24 रा. एस.व्ही. नगर, रामटेकडी, हडपसर) हे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. पुणे सोलापूर रोडवरील क्रोमा चौकातील काळुबाई मंदिरासमोर पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. गर्दीचा फायदा घेऊन दोन लाख 88 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळून जाताना वानवडी पोलिसांनी चोरट्याला अटक केली. याबाबत दिपक सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सन्नीकुमार बारिस महतो (रा. मु.पो. तीन पहाड, जि. साहीबगंज, झारखंड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. (Arrest In Theft Case)

पतीसोबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरुन नेले. हा प्रकार गोंधळेनगर कमानीसमोर सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला. याबाबत 30 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी धुरपता अशोक भोसले (वय-31 रा. टाकळी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या महिलेला अटक केली.

तसेच सासवड रोडवर भेकराईनगर येथे मुक्ताई पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसका मारुन चोरून नेले. ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत महिलेने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन गोवर्धन सुरेश काळे (रा. जामखेड) याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.