Pune Crime News | पुणे: खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, दोघांवर FIR

khandani-1

पुणे : Pune Crime News | निवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) असल्याचे सांगून खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आरटीओ एजंटकडे (RTO Agent) खंडणी मागणाऱ्या (Extortion Case) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 27 जून 2024 या कालावधीत आरटीओ कार्यालयात घडला आहे.

याबाबत देवेंद्र हिरालाल खिंवसरा (वय-50 रा. मंगळवार पेठ, मुथा अपार्टमेंट, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून ललित पंडोळे व अजय पोपट मखरे यांच्यावर आयपीसी 181, 182, 211, 384, 389, 500, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मागील 8 ते 9 महिन्यापासून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन संपर्क साधला. त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

आरोपींनी फिर्यादी यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवून त्यांना मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. आरोपी ललित पंडोळे याने निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या मोबाईल क्रमांकावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरून फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून अटक पूर्व जामीन मिळवला आहे. असे असताना ललित पंडोळे याने फिर्यादी यांच्या फोटोचा वापर करुन त्यावर गुन्ह्याचा नंबर टाकून फरार आरोपी असे लिहून, तसेच बोगस आरटीओ एजंट असा टॅग लावून सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.