Supriya Sule On Reels | सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रिल्स वर भाष्य; म्हणाल्या – ‘पाच मिनिटे…’

0

पुणे : Supriya Sule On Reels | गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रिल्सच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात त्यांनी यावर मत व्यक्त केले आहे. ‘धोरण कुठवर आलं गं बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ही या कार्यक्रमात करण्यात आले.

सुळे म्हणाल्या, ” दिवसातून केवळ पाच मिनिटे रिल्स पाहते. त्यानंतर फोन लॉक होतो. दोन तास पाहात राहिले तर गेली खासदारकी रिल्स बघण्यात. रिल्सच्या नावाखाली काहीही केले जात आहे, गंभीर प्रकार निदर्शनास येत आहेत. त्याबाबत सुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांशी याबाबत बोलले पाहिजे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडले.

कोणतेही धोरण आणले तरी दर पाच वर्षांनी त्याच्या परिणाम, बदलांचा अभ्यास केला पाहिजे. तीस वर्षांपूर्वी मोबाइल, इंटरनेटसारखे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मात्र आता डीपफेक, डार्कनेटसारखे तंत्रज्ञान आले आहे. त्याचे परिणाम आवश्यक आहे. एकल महिलांसाठी धोरण आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच महिलांसाठी फेलोशिप सुरू केली जाणार आहे.

आजही हुंड्याचा प्रश्न आहे. महिला धोरण येऊनही असे प्रश्न असतील तर समाज म्हणून विचार होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. त्याबाबत लवकर कार्यवाही आवश्यक आहे असे सुळे यांनी सांगितले.

ज्येष्ठ उद्योगिनी अनु आगा, केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, रोहिणी खडसे, अजित निंबाळकर, अंकुश काकडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.

यावेळी मीनाक्षी पाटील यांना साहित्यासाठी, कलावती सवणकर यांना कृषि क्षेत्रासाठी, रुक्मिणी नागापुरे यांना सामाजिक क्षेत्रासाठी, श्रद्धा नलमवार यांना क्रीडा क्षेत्रासाठी, संध्या नरे पवार यांना पत्रकारिता क्षेत्रासाठी, राजश्री गागरे यांना उद्योग क्षेत्रासाठी यशस्विनी सन्मान प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.