Rahul Gandhi | तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले – “जे बोललो ते करून दाखवलं…”

0

तेलंगणा : Rahul Gandhi | तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांवरील ३१,००० कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार १५ ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांचा पक्ष कायम शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

याबाबत राहुल गांधी यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे, ” तेलंगणातील शेतकरी बांधवाना शुभेच्छा. काँग्रेस सरकारने आपले २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. त्यामुळे ४० लाखांहून अधिक शेतकरी कुटुंब मुक्त होतील. जे बोललो, करून दाखवलं, हीच नियत आहे आणि सवयही.

पुढे राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस सरकारचा अर्थ, राज्याच्या तिजोरीतील पैसा शेतकरी, मजूर आणि वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी खर्च होईल, याची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय त्याचे उदाहरण आहे. आमचे आश्वासन आहे की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे-तिथे भारताचा पैसा भारतीयांवर खर्च करेल, भांडवलदारांवर नाही.”

तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास ४७ लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची रूपरेषा लवकरच अधिसूचित केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणातील जनतेला आश्वासन दिले होते की, राज्यात आपले सरकार आल्यास आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. काँग्रेसला या आश्वासनाचा मोठा फायदा झाल्याचेही बोलले जाते.

तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कर्जमाफी योजना १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.