Pimpri Chinchwad Rains | पिंपरी चिंचवडमधील काही भागात अतिवृष्टी; एका तासात 114 मिमी पावसाची नोंद (Video)

Rain

चिंचवड : Pimpri Chinchwad Rains | पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, आकुर्डी, मोहननगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पावसाने गटारी तुंबली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

एका तासात ११४ मिमी पावसाची नोंद चिंचवडला झाली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यांनतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारनंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली.

शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडला. त्यामध्ये चिंचवड लिंक रोड, मोहननगर, स्पाईन रोड, पूर्णानगर,आकुर्डी परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याचे नागरिकांचे मत आहे. सायंकाळी साडेचार ते सव्वा पाच या वेळेत जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे शहर परिसरातील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पावसाळी गटारे तुंबल्याचे दिसून आले. विविध भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याचेही नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनास कळविले होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध भागांमध्ये जाऊन पाणी काढण्यास मदत केली.