Indian Railway | आता खच्चून भरलेल्या ट्रेनमधून करावा लागणार नाही प्रवास, टीकेनंतर रेल्वेला आली जाग, संपणार जनरल डब्ब्यांची समस्या

नवी दिल्ली : Indian Railway | विना रिझर्व्हेशन ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना रेल्वे मोठी भेट देणार आहे. आता जनरल कोचमध्ये तुफान गर्दीत धक्के खात प्रवास करावा लागणार नाही. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रवाशांच्या सुविधेसाठी जनरल कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कोच मेल आणि एक्सप्रेस दोन्ही प्रकारच्या ट्रेनमध्ये वाढवले जातील. संपूर्ण रेल्वेत दोनच जनरल कोच देणाऱ्या रेल्वेवर मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार टीका होत असल्याने इतक्या वर्षानंतर रेल्वेला ही जाग आली आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक अशा पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये जनरल कोचमध्ये भीषण गरमीत सुद्धा लोक खच्चून भरलेल्या डब्ब्यातून प्रवास करत आहेत. दूरच्या अंतराच्या बहुतांश ट्रेनची हीच आवस्था आहे आणि लाखो लोक रोज धक्के खात जनरल कोचमधून नाईलाजाने प्रवास करतात. परंतु, आता रेल्वेला जाग आली असून रेल्वेने जनरल कोचची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
किती कोच लावले जाणार
रेल्वे बोर्डच्या अलिकडच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आले की, देशातील मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये २,५०० जनरल कोच लावले जातील. बोर्डाने म्हटले की, जनरल कोचच्या निर्मितीचा जो वार्षिक कोटा आहे, त्यामध्ये वाढ केली जाईल. या निर्णयामुळे देशातील मेल आणि एक्सप्रेस ट्रेनची क्षमता सुद्धा वाढेल. एका अंदाजानुसार, जनरल कोचमध्ये वार्षिक सुमारे १८ कोटी लोक प्रवास करतात.
आता प्रत्येक ट्रेनमध्ये किती कोच
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्रेनमध्ये केवळ दोन जनरल कोच असतात. ही संख्या आता दुप्पट म्हणजे ४ केली जाईल. ज्या ट्रेनमध्ये सध्या एकही जनरल कोच नाही तिच्यात दोन कोच लावले जातील. प्रत्येक कोच असा डिझाईन केला जाईल की यामध्ये १५० ते २०० लोक आराम बसू शकतील. याचा लाभ रोज प्रवास करणाऱ्या सुमारे ५०० प्रवाशांना होईल.
कधी तयार होतील कोच
रेल्वे बोर्डाच्या बैठकीत निर्णय झाला की, २,५०० ट्रेनमध्ये कोच वाढविण्याचे काम याच आर्थिक वर्षात म्हणजे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासोबतच १,३७७ स्लीपर कोच सुद्धा बनवले जात आहेत.