Congress Bhavan Pune | काँग्रेस भवनात दोन गटात हाणामारी; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

0

पुणे : Congress Bhavan Pune | मागील दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली होती. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला मात्र भाजपने अशा प्रकारे कसलीच मारहाण झाली नसल्याचे म्हंटले. आता काँग्रेस भवनात आज हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

कॉँग्रेसचे कार्यकर्ते मुकेश मधुकर धिवार यांना एका माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. धिवार हे दिवंगत नेते पतंगराव कदम आणि कॉँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे निकटवर्ती आहेत.

दोन दिवसांपूर्वी श्री शंकर महाराज मठात भारतीय जनता पक्षाच्या दोन गटात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समोरच हाणामारी झाली होती. त्यावेळी मुकेश धिवार देखील मठात उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात भाजप आणि रा. स्व. संघाच्या हिंदुत्वावर टीका करणारा व्हिडिओ मठामध्ये रेकॉर्ड करून समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. आता, धिवार यांनाच कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन कॉँग्रेस पक्षात सुरू झालेली धुसफूस अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचे कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना माजी नगरसेवक आबा बागूल यांनी विरोध केला होता. त्यावेळी धिवार यांनी बागूल यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी केली होती.

दरम्यान, या वादाची किनार या हाणामारीला आहे का? हे पोलिसांकडून तपासून पाहिले जात आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या एकास ताब्यात घेतले आहे. धिवार यांच्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.