Ram Satpute – Malshiras Assembly Constituency | “मृत्यू जरी झाला तरी अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार…”; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी ठोकला शड्डू

0

माळशिरस : Ram Satpute – Malshiras Assembly Constituency | लोकसभेच्या पराभवानंतर आता राम सातपुते यांनी आगामी विधानसभेची तयारी सुरु केलेली आहे. आपल्याला बीडचे पार्सल म्हणून जरी हिणवलं असलं तरी आपण माळशिरस तालुक्यातच जनतेसाठी स्वतःला गाडून घेऊ. माझ्या मृत्यूनंतरही माझे अंत्यसंस्कार माळशिरस येथे होतील, असे सांगत आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेसाठी शड्डू ठोकल्याचे दिसत आहे.

आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या माळशिरस विधानसभा मतदार संघात संकल्प मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले. यावेळी महायुतीचे सर्वच पदाधिकारी होते. भारतीय जनता पार्टी निवडणूक हरत नाही आणि हरली तर त्यातून खूप काही शिकते.

भाजप त्याग, तपश्चर्या आणि संघर्षातून वर आलेली पार्टी आहे. त्यामुळे खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सक्षमपणे उभे रहा, असे प्रतिपादन माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी महायुतीच्या संकल्प मेळाव्यात केले. या संकल्प मेळाव्यात लोकसभेतील अपयश आणि विधानसभेच्या यशासाठी विचार विमर्श आणि चिंतन करण्यात आले.

“मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे. मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो. पण मी इकडेच राहिलो. आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो, मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे.

तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभे रहा, येणाऱ्या काळात १०० टक्के महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे, आता नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. आपण माळशिरस तालुक्यातही तयारी सुरू करुया असंही राम सातपुते म्हणाले.

“आपल्याला शांतीत क्रांती करायची आहे. आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊ. पुन्हा एकदा तालुक्यात महायुतीचा आमदार देऊ. काही जणांनी माझ्यावर टीका केली, काही जणांनी मला हिणवलं. पण माळशिरस तालुक्यातील जनतेला सांगतो, मागचे पाच वर्षे या तालुक्यातील जनतेची सेवा केली.

तुमचा सालगडी म्हणून राहिलो, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत माझ्या शरिरात रक्ताचा थेंब आहे मी या मातीत गाडून घेईन. तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही, माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार असे आमदार सातपुते यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.