Phule Shahu Ambedkar Vichar Manch | संत कबीर-छत्रपती शाहू महाराज यांचे विचार म्हणजे शुद्ध प्रबोधन : डॉ. श्रीपाल सबनीस

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे आचार्य रतनलाल सोनग्रा, हनुमंत पपुल यांचा गौरव
पुणे : Phule Shahu Ambedkar Vichar Manch | कबीर हे संतसाहित्यातील महानायक आहेत. त्यांचा एक वेगळा पंथ आहे, ज्याला मर्यादा नाही. कबीरांचे मानवतावादी विचार छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी मानवतावादी भूमिकेतून समता साधली. समतेच्या विचारांची पेरणी करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांकडे पाहिले जाते. संत कबीर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार-कार्य म्हणजे शुद्ध प्रबोधन होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे विश्वपारखी संत कबीर व छत्रपती शाहूजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वपारखी संत कबीर पुरस्काराने आचार्य रतनलाल सोनग्रा तर छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कराने हनुमंत पपुल यांचा गौरव डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर व्यासपीठावर होते. पंचशील शाल, ग्रंथ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सबनीस म्हणाले, आजच्या महाराष्ट्राचा नकाशा बेचिराख झाला आहे, तो छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, फुले-शाहू-आंबेडकर यांचा राहिलेला नाही. येथे जातीभेदांच्या भिंती निर्माण झाल्या असल्याने महापुरुषांच्या संवादी विचारांची बेरीज होणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांच्या सामर्थ्याची वाटणी होणे योग्य नाही. आजच्या काळात धार्मिक वाद निर्माण न करता सर्व धर्माच्या संकुचित भिंती दूर करून समाज जपणे गरजेचे आहे. संत कबीर व छत्रपती शाहू महाराज यांचे विचार अमलात आणून ते समाजात पेरावे लागतील.
अध्यक्षपदावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आचार्य रतनलाल सोनग्रा व हनुमंत पपुल यांचा अनुक्रमे संत कबीर तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.
सत्काराला उत्तर देताना आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, ज्याला कबीराचा एक दोहा येतो तो भारतीय ही माझी भारतीयत्वाची व्याख्या आहे. महात्मा फुले, आचार्य अत्रे यांनी देखील कबीराची महती जाणली. कबीर व इतर संतांचे विचार हे सामान्य माणसांचे प्रेरणास्थान आहेत. कबीरांनी समाजाला बौद्धिक, वैचारिक, तार्किक, विवेकी विचार दिले. कबीर हे भारतीय ऐक्याचे प्रतिक आहेत. यामुळेच आजच्या परिस्थितीत भारतातील ऐक्य धोक्यात असताना कबीरांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
पुरस्कराबद्दल हनुमंत पपुल यांनी आभार मानले. परशुराम वाडेकर म्हणाले, कबीर हे त्या काळातील समाजव्यवस्थेवर, जातीव्यवस्थेवर परखड- प्रखर भाष्य करणारे होते. त्यांनी सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य केले. आजच्या समाजिक परिस्थितीत कबीरांचे विचार अंगीकारून जगणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती देत सूत्रसंचालन केले.