Maharashtra Politics | पंकजा मुंडे खासदार होणार? राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरु

0

बीड: Maharashtra Politics | राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs Maratha) असा संघर्ष सुरू आहे. ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde On Rajya Sabha) यांना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे ही मागणी जोर धरत आहे.

पीयूष गोयल (Piyush Goyal), नारायण राणे (Narayan Rane) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे राज्यसभेवरील तीनही सदस्य लोकसभेत गेल्याने जागा रिक्त आहेत. या जागांवर भाजप कुणाला पाठवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी लावून धरली होती. पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत. त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे असा सूर बीडमधून येत आहे. एवढंच नाही तर नगरमध्ये पोस्टरही लागले आहेत. भाजपच्या एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्याही केल्या आहेत. भाजपा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.