Yerawada Jail | येरवडा कारागृहात चक्क कैद्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धा

0

पुणे : Yerawada Jail | आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) व इंडीयन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय ‘चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे १९ ते २१ जून या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta IPS) यांनी केले.

या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर (Dr Jalindar Supekar), कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे (Swati Sathe), येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ (Sunil Dhamal), इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, फिडेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

‘परिवर्तन प्रिझन टू प्राईड-नई दिशा’ या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदिवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त करुन श्री.गुप्ता म्हणाले, कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. सुवर्णपदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देवून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

मागील वर्षी एक प्रयत्न म्हणून येरवडा कारागृहात बंदिवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केल्यानंतर एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बंदिवानांनी चांगली तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेल. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते या कारागृहातील बंदीवान खेळाडूंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरूष असे २०० बंदी बुद्धिबळ शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती गोविल म्हणाल्या, बुद्धिबळामुळे बुद्धीला चांगली चालना मिळते व परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण होते. त्यामुळे बंदिवानांना भविष्यात याचा लाभ होईल.

विविध देशांतील कारागृहांतील बंदिवानांना बुद्धिबळ या खेळामध्ये प्रशिक्षण देवून विविध देशांतील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून बंदीवानांमध्ये तुरूंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यातही काही कौशल्ये आहेत ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू असा आत्मविश्वासही निर्माण होऊ शकणार आहे, अशी माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.