UGC-NET Examination | पेपरफुटीच्या संशयाने UGC – NET परीक्षा रद्द; CBI करणार चौकशी

0

पुणे : UGC-NET Examination | उद्याची परीक्षा जीवनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे याची जाण ठेऊन गंभीरपणे आणि काहीशा तणावात एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने संभाव्य प्रश्नोत्तरांची उजळणी करत झोपी जावे आणि दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आल्यानंतर तो पेपर रद्द झाल्याची बातमी समजणे ही तीव्रता ज्यांच्या घरात बेरोजगार आहेत त्यांनाच समजेल. परीक्षांमध्ये गोंधळ होण्याची, पेपर फुटण्याची किंवा परीक्षा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे आपल्या समोर आलेली आहेत.

नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १८ जून रोजी झालेली UGC – NET परीक्षा २०२४ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून यूजीसीला पेपरफुटीची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला आहे.

UGC NET ची परीक्षा देशभरातील विद्यापीठांतील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रीसर्च फेलोशिप (JRF) आणि साहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. १८ जून २०२४ रोजी ३१७ शहरांतील १ हजार २०५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ९ लाख ९ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी NET ची परीक्षा दिली होती.

याबाबत NTAने म्हटले की, “परीक्षा प्रक्रियेची उच्च स्तरावरील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून २०२४ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती लवकरच दिली जाईल. तसेच CBI या प्रकरणाची चौकशी करेल. NEET (UG) परीक्षा-2024 शी संबंधित प्रकरणामध्ये ग्रेस मार्कशी संबंधित समस्या पूर्वीच पूर्णतः हाताळली गेली आहे.

पाटणा येथे झालेल्या परीक्षेत काही अनियमिततेचा आरोप झाल्याप्रकरणी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल.” तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेचा या प्रकरणात समावेश आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पुन्हा देण्यात आला आहे.

NEET UG २०२४ मध्ये झालेल्या गोंधळाबाबत देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने NTA ला दोन आठवड्यांची नोटीसही बजावली आहे. पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.