Vishrantwadi Pune Crime News | पुणे: उघड्या दरवाजा वाटे 63 मोबाईल आणि 19 लॅपटॉपची चोरी, सख्ख्या भावांना अटक; विश्रांतवाडी पोलिसांकडून 32 लाखांचा ऐवज जप्त

mobiles

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | शहरातील विविध भागात दरवाजा उघडा असणाऱ्या घरांमध्ये शिरुन चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 19 लॅपटॉप, 63 मोबाइल आणि चार स्मार्ट घड्याळे असा एकूण 32 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई धानोरी (Dhanori) खाणी शेजारी केली आहे. आरोपींनी पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बाबू राममूर्ती बोयर (वय 29) आणि सुरेश राममूर्ती बोयर (वय 24, रा. लोणी काळभोर, मूळ रा.आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अवघ्या पंधरा दिवसांत पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडी घरे आणि पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांच्या घरांत शिरून मोबाइल, लॅपटॉप आणि स्मार्ट घड्याळे चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर (Tingre Nagar Pune) परिसरात 5 जून रोजी एका घरातून तीन मोबाईल व एक लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली होती. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलांच्या खोलीतून नऊ जून रोजी तीन लॅपटॉप आणि सात मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दाखल गुन्ह्यांचा तपास करत असताना दोन संशयित चोरटे धानोरी खाणी शेजारी उभे असल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय बादरे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.