Forest Dept On Sinhagad Fort Ghat | सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; वनविभागाने घेतला ‘हा’ निर्णय; जाणून घ्या…

पुणे : Forest Dept On Sinhagad Fort Ghat | सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावताना दिसते. सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती करते. समितीकडून त्याबाबत योग्य निर्णय न घेतल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता सुरळीत वाहतूक करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाने वन समितीला दिल्या आहेत.
सिंहगड घाटातील शेवटच्या तीन किलोमीटरमध्ये रविवारी (ता. १६) नियोजन फसल्याने सुमारे चार तासाहून अधिक काळ गड वाहतुकीसाठी बंद होता. तसेच सोमवारी सुट्टी असल्याने गर्दी झाली होती. परिणामी, वाहतूक कोंडी झाली होती.यासाठी समिती नियोजन करीत आहे.
सिंहगडावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे थांबविणार, त्याचवेळी गडावरील वाहन तळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहन तळावरून एक ही वाहन खाली येणार नाही, असा प्रयोग करण्यात येणार आहे.
पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येचे प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे. या संदर्भात तातडीने त्याची अंमलबजावणी या शनिवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या स्तरावर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश आणि सूचना देखील केल्या आहेत अशी माहिती प्रदीप संकपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा यांनी दिली आहे.