Maharashtra BJP | राज्यातील भाजप नेतृत्वात बदल होणार? दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक

मुंबई : Maharashtra BJP | राज्यात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. यंदा भाजपाला अवघ्या ९ जागांवर तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळाला आहे. या निकालाचा आढावा घेण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांची बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत पार पडणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही चर्चा होईल.
महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उद्या दिल्लीला जातील. त्याठिकाणी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्वात बैठक होईल. नुकतेच महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली त्याचसोबत मला सरकारमधून मुक्त करावं अशी मागणी वरिष्ठांकडे केली.
फडणवीसांच्या या निर्णयावर भाजपा नेतृत्व उद्या विचारमंथन करेल. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), आशिष शेलार (Ashish Shelar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह इतर नेते उपस्थित राहतील. याआधीही लोकसभा निकालावर मागील शुक्रवारी प्रदेश भाजपाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), रक्षा खडसे (Raksha Khadse), भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade) हेदेखील उपस्थित होते.
बैठकीत सर्वात आधी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले त्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीवर चर्चा करण्यात आली. राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात विरोधकांना यश आलं, संविधान बदललं जाणार असा खोटा प्रचार विरोधकांनी केला.
पहिल्या तीन टप्प्यात हा प्रचार अधिक झाला, त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांपैकी केवळ ४ जागाच आम्हाला जिंकता आल्या. मात्र उर्वरित टप्प्यात विरोधकांच्या या खोट्या नॅरेटिव्हला रोखण्यात महायुतीला यश आलं, त्यामुळे त्यानंतरच्या २४ जागांपैकी १३ जागांवर महायुती (Mahayuti) विजयी झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे.