Sandeep Khardekar On Pune Rains | पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; पावसाळी कामाची चौकशी करा, संदीप खर्डेकर यांची मागणी

0

पुणे : – Sandeep Khardekar On Pune Rains | पुणे महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation) ‘पावसाळापूर्व कामे’ या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च केला. मात्र, पहिल्याच पावासात पुणे शहरात सर्वत्र पाणी साचून शहराला तळ्याचे स्वरुप आले. त्यामुळे पुणे महापालिकेने गटारांची साफसपाई खरच केली का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुण्यात साचलेल्या पाण्यावरुन भाजपचे नेते संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांना निवेदन देऊन पावसाळी कामासाठी एक कोटीचे बजेट मंजूर झाले होते, ते कुठे गेले याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अवकाळी आणि अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केल्याचे वाचनात आले, तर विविध सोसायट्यात ब्लॉक बसविल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा शोध देखील लागला असल्याचे वृत्तपत्रातून समजले. साहेब, चूक मान्य करून ती दुरुस्त करून सामान्य पुणेकरांना दिलासा देऊन मनाचा मोठेपणा आणि कार्य कुशलता दाखवावी.

वानगी दाखल दोनच रस्त्यांची माहिती देतो, आपण प्रत्यक्ष येऊन बघा. महिन्याभरापूर्वी उत्तम डांबरीकरण केलेला समर्थ पथ (अलंकार पोलीस स्टेशन ते प्रतिज्ञा मंगल कार्यालय) आणि कर्वेनगर मधील कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज समोरचा पाणंद रस्ता चार दिवसापूर्वीच्या अकल्पित पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. मात्र आज किरकोळ पाऊस झाला तरी जागोजागी तळं साचलेलं दिसतंय. हे डांबरीकरण नीट न झाल्यामुळेआहे असे स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्याचा उतार, चेंबर चे ठिकाण, याचा अभ्यास न करताच डांबरीकरण केले जाते आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो. पावसाळी व ड्रेनेज लाईन्स च्या सफाई बाबत तर न बोललेलेच बरे.

समर्थ पथावर प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड पाणी साचले व तेथील सोसायटीत घुसलेले पाणी चार तासानंतर उपसता आले. गत वर्षी देखील येथे अशीच गंभीर स्थिती झाली होती व स्वतः आयुक्त विक्रम कुमार यांनी रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा होईपर्यंत तेथे थांबून मदतकार्य केले होते. यावर्षी याची पुनरावृत्ती होताना नागरिकांना प्रश्न पडला की “येथे मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे प्रशासनाचे आश्वासन कुठे विरले? मिळालेल्या माहितीनुसार यासाठी एक कोटीचे बजेट देखील मान्य झाले होते, ते कुठे गेले याची चौकशी व्हावी.

आता टोलवा टोलवी न करता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अहवाल मागवावा व तेथे काय उपाययोजना करता येईल ते बघून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.