Hinjewadi Police News | पिंपरी : हिंजवडी पोलिसांकडून 1 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक

0

पिंपरी : Hinjewadi Police News | शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली असून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसरोड आणि विनोदे वस्ती वाकड येथे बुधवारी केली.

सुसरोडवरील वेस्टर्न हिल्स सोसायटीसमोर करण्यात आलेल्या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई सकाळी साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. रामदेव रत्नाकर सोडा (वय-30 रा. सुसगाव, ता. मुळशी), बिष्णोई (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 328, 269, 270, 272, 273, 188, 34 नुसार गुन्हा दाखल करुन रामदेव सोडा याला अटक केली आहे.

याबाबत पोलीस अंमलदार अविनाश सगर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रामदेव सोडा याने बिष्णोई याच्याकडून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अॅक्टीव्हा गाडीवरुन घेऊन जात होता. त्यावेळी हिंजवडी पोलिसांनी त्याला थांबवून गाडीवरील गोणीची झडती घेतली. त्यावेळी प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून गुटखा, मोबाईल, दुचाकी असा एकूण 49 हजार 924 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करीत आहेत.

हिंजवडी पोलिसांनी दुसरी कारवाई वाकड भागातील विनोदे वस्ती येथील स्कायलाईन सोसायटीच्या शेजारील पानाच्या टपरीवर केली. या कारवाईत पोलिसांनी ब्रीजनंदन दीनबंधू वर्मा (वय-40 रा. विनोदे वस्ती, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपीने पानाच्या टपरी मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री साठी ठेवला होता. पोलिसांनी पान टपरीची तपासणी करुन 47 हजार 711 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.